‘लवासा’ आणि ‘सहारा’ प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आंदोलन केले होते ; मारुती भापकर यांचे स्पष्टीकरण

पुणे- महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेधना साकोरे बोर्डीकर यांनी ‘कर्जत भीमाशंकर वृक्षतोड होते म्हणून त्या विरोधात ओरडणारे आंदोलन करणारे लवासा लेक सिटी, सहारा सिटी प्रकल्प उभारण्यात येत होते त्यावेळी हे आंदोलन करणारे कुठे झोपले होते? त्यावेळी आंदोलने का झाली नाहीत ?’. असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यावर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी या वक्तव्याचा समाचार घेत याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात लवासा प्रकल्पांच्या विरोधात आम्ही अनेक आंदोलने केली होती असे स्पष्टीकरण दिले आहे.
या पत्रकात मारुती भापकर यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील कर्जत भीमाशंकर येथील टोरंट जलविद्युत प्रकल्प व उजनी धरण क्षेत्रात एआयडेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन व अनुप्रकल्प या विरोधात शेतकरी शेतमजूर मच्छीमार आदिवासी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देऊन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकल्पांचे व वृक्षतोडीचे समर्थन करताना विरोधक या प्रकल्पांना विरोध करून ‘फेक नेरेटीव’सेट करीत आहेत असे वक्तव्य केले. त्यानंतर या प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, चित्रा वाघ आदि भाजपानेते सरसावले. महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेधना साकोरे बोर्डीकर यांनी देखील कर्जत भीमाशंकर वृक्षतोड होते म्हणून त्या विरोधात ओरडणारे आंदोलन करणारे लवासा लेक सिटी, सहारा सिटी प्रकल्प उभारण्यात येत होते त्यावेळी हे आंदोलन करणारे कुठे झोपले होते? त्यावेळी आंदोलने का झाली नाहीत. असे जाहीर वक्तव्य केले होते.
अलीकडेच अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनच्या वतीने कर्तुत्ववान मराठा दुर्गा या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान राज्यमंत्री मेधना बोर्डीकर यांच्याशी भेट झाली असता मी राज्यमंत्री बोर्डीकर यांना आपण लवासा लेक सिटी प्रकल्प व सहारा सिटी प्रकल्पाच्या विरोधात जे वक्तव्य केले ते अज्ञानातून व चुकीच्या माहितीवर केले असून लवासा प्रकल्पांच्या विरोधात आम्ही अनेक आंदोलने केली होती. आमच्यावर पोलीस केस झाल्या, लवासा १७ गावांमध्ये होणार होते. मात्र आमच्या लढ्यामुळे केवळ एक दोन गावे बाधित झाली. उर्वरित गावामध्ये हा प्रकल्प होऊ शकला नाही अशी माहिती दिली.
यावेळी बोर्डीकर यांनी जलविद्युत प्रकल्पाचे समर्थन करताना ते प्रकल्प खासगी होते. या प्रकल्पांचा फायदा नागरिकांना होणार आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर आम्हाला विकास हवा आहे विनाश नको आपण सत्ता,पक्ष याचा विचार न करता सजग भारतीय म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होणारे, शेतकरी कष्टकरी व नागरिकांचे भविष्य उध्वस्त करणारे प्रकल्प सत्तेच्या जोरावर नागरिकांच्या माथी नाही मारले पाहिजे असे राज्यमंत्री बोर्डीकर यांना स्पष्ट सांगितल्याचे भापकर म्हणाले.






