नवी दिल्ली- नवनियुक्त केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आपल्या परीक्षा पथकात मोठा फेरबदल करत ६०० परीक्षा तज्ज्ञांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या जागी नवीन व कसलेल्या तज्ज्ञांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली NTAच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. परीक्षांचे सुरळीत आयोजन, प्रश्नपत्रिकांची सुरक्षा आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या छाननीमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी यापुढे चार-स्तरीय प्रणाली व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा यामागील उद्देश आहे.
पुढील दोन ते तीन आठवड्यांत सुमारे 20 ते 25 अधिकाऱ्यांची NTAमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील टप्प्यात आणखी कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. यामुळे परीक्षा आयोजित करण्यापासून प्रश्नपत्रिका व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेपर्यंत NTAची प्रशासकीय क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्याचप्रमाणे NTAची कार्यालये नवीन ठिकाणी हलवण्यात येणार असून नवीन कार्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी Central Industrial Security Force (CISF)च्या पथकांची मदत घेतली जाणार आहे.
