शिरूर – बेकायदेशीरपणे भिशी चालवून, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष दाखवत जवळपास ३९ जणांकडून वीस कोटींहून अधिक रक्कम जमा करून त्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तिघांना अटक केली आहे. हा प्रकार २०२० ते २०२५ च्या दरम्यान कारेगाव (ता. शिरूर) येथे घडला आहे.
सुलभा शरद नवले (वय-५०), नितीन शरद नवले (वय-३२), सुहास शरद नवले (वय-३०), अश्विनी नितीन नवले व प्रतीक्षा सुहास नवले (सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध फसवणुक व आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुलभा नवले, नितीन नवले व सुहास नवले यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आज अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणी बारकू चंदर सोनवणे (रा. चंदननगर, पुणे, मूळ रा. वाघाळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलभा नवले व त्यांच्या कुटुंबातील इतरांनी सन २०२० मध्ये कारेश्वर भिशी मंडळ स्थापन केले. कुठल्याही सरकारी कार्यालयात, बॅंकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसतानाही आपले भिशी मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवत दामदुप्पटीचे आमिष दाखवून अनेकांकडून बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले. डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांचा हा उद्योग बिनबोभाटपणे चालू होता. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आपण गुंतविलेले पैसे व त्यावरील परताव्याची मागणी केली असता, संबंधितांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली. अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली. काहींना दमदाटीही करण्यात आली.
अनेकदा मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बारकू सोनवणे यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. गेले दोन दिवस पोलिसांनी सर्व संबंधितांचे जाबजबाब नोंदविल्यानंतर, गुंतवणूक केलेल्या रकमेच्या नोंदींची पडताळणी केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सोनवणे यांच्यासह ३९ जणांनी या भिशी मंडळात तब्बल वीस कोटी ३४ लाख ६५ हजार पाचशे रूपयांची गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. सुलभा नवले व इतरांनी संबंधितांना स्वतःच्या तसेच इतर बॅंक खात्यांवर रकमा वर्ग करण्यास सांगून रोख व ऑनलाईन स्वरूपात मोठ्या रकमेचा अपहार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम पुढील तपास करीत आहेत.
