पुणे – मोठ्या भावाकडून पैसे घेण्यासाठी एका १९ वर्षाच्या तरुणाने आपले अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी काही तासातच त्याचा प्लॅन उघडकीस आणला.
मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेला १९ वर्षीय तरुण ओम प्रकाश गौरीशंकर हा नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर बेरोजगार असल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत होती. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि प्रेयसीला पैसे देण्यासाठी त्याला मोठ्या रकमेची गरज होती. मग त्याने अजब शक्कल लढवली.
कुटुंबीयांकडून पैसे उकळण्यासाठी त्याने स्वतःला दोरीने बांधल्याचा आणि ढसाढसा रडतानाचा एक बनावट व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्याने उत्तर प्रदेशातील आपल्या मोठ्या भावाला व्हॉट्सॲपवर पाठवला आणि सुटकेसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. व्हिडिओ पाहून घाबरलेल्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर पोलिसांत तक्रार केली. तिथल्या पोलिसांनी तातडीने पुणे पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
पुणे पोलिसांच्या बंडगार्डन आणि खडकी पोलीस पथकांनी तरुणाच्या मोबाईल लोकेशनचा माग काढला. त्याचे लोकेशन पुण्यातील खडकी येथील ‘क्राउन प्लाझा लॉजिंग’ येथे आढळून आले. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता, तिथे कोणताही अपहरणकर्ता नव्हता, तर तो तरुण खोलीत आरामात बसलेला आढळला.
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्याने केवळ पैशांसाठी हा संपूर्ण कट रचल्याची कबुली दिली असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
