मुंबई- आज, गुरुवारपासून राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी विषयाची परीक्षा होणार आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची सूचना देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
या नियमाची अंमलबजावणी उद्या २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
राज्यात १९८९ पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्यावतीने गेल्या १०५ दिवसांपासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाला सुमारे १ लाख ६५ हजार ६०० अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी प्रतिसाद देत मराठीचे प्रशिक्षण घेतले. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सहभागी चालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या सर्व चालकांचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी अभिनंदन केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. मुंबईने नेहमीच देशभरातील नागरिकांना सामावून घेतले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान राखणेही तितकेच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात १९८९ पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी शिकणार नाही, बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत कारवाई करणे हे परिवहन विभागाचे कर्तव्य आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
राज्यात आतापर्यंत सुमारे ९ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने व बॅज देण्यात आले आहेत. यापुढे नवीन परवाना व बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करेल आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच बॅज देण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
