पिंपरी- ‘कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने प्रगती प्रेस टूल्स इंडिया प्रा. लिमिटेड या आस्थापनाला पद्मश्री नारायण सुर्वे प्रगतशील उद्योग पुरस्कार प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. प्रगतीचे संचालक लक्ष्मण काळे आणि राम काळे यांनी पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी टाटा मोटर्स ग्रामविकासाचे प्रणेते मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते. तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पिंपरी – चिंचवड महापालिका ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे यांना मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह सुनील महाजन यांना पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांना पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार, कवी कुमार खोंद्रे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, केशवसुत, मर्ढेकर आणि सुर्वे हे मराठी कवितेतील तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. आईचा गौरव असंख्य प्रतिभावंतांनी केला आहे; पण नारायण सुर्वे यांनी आपल्या अज्ञात आईविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि मातृत्वाचा सन्मान अद्वितीय आहे; तसेच त्यांची कविता ही सर्वसामान्य माणसांसाठीची कविता आहे.
सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण काळे यांनी पुण्यात काम शोधण्यासाठी आलो. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा उद्योग सुरू केला; पण मालक या नात्याने कधीही कामगारांशी वागलो नाही. रतन टाटा हे माझे आदर्श असून प्रगती टूल्स म्हणजे एक कुटुंब आहे अशा शब्दांतून आपला प्रवास कथन केला.
अनुराधा गोरखे यांनी,अतिशय हलाखीत जीवन व्यतीत केले; पण कष्टाची कधी लाज बाळगली नाही. तेच संस्कार मुलांवर झाले आहेत. त्यामुळे घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असा कृतार्थ भाव व्यक्त केला.
सुनील महाजन यांनी आजपर्यंत पडद्यामागे राहूनच काम करण्यात मला स्वारस्य वाटत आले आहे. सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार अखंड प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
महेंद्र भारती यांनी, वडिलांची गरिबी असल्याने त्यांचे अप्रकाशित साहित्य त्यांच्या पश्चात समाजापुढे आणतो आहे. अशी भावना व्यक्त केली तर कुमार खोंद्रे यांनी स्वरचित पिंपरी-चिंचवडची लावणी सादर करून दाद मिळवली. मनोहर पारळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम फक्त आईच करू शकते असे मत मांडले.
सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, कविवर्य सुर्वे हे कष्टकरी समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते अशी भावना व्यक्त केली. नारायण सुर्वे काव्यजागर कविसंमेलनात राजेंद्र वाघ, रजनी कानडे, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, स्वाती भोसले यांनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून हितगुज केले. मुरलीधर साठे, बाजीराव सातपुते, अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गांधलीकर यांनी आभार मानले.
