आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांची जामिनावर सुटका

पुणे- आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या अजित पवार गटाच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. लक्ष्मी आंदेकर या मागील काही दिवसांपासून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात होत्या.
लक्ष्मी आंदेकर यांच्यावर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली होती. याप्रकरणी त्यांनी वारंवार पुणे सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आता अखेर त्यांना २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहणे आणि खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. लक्ष्मी आंदेकर यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि सहकाऱ्यांनी युक्तिवाद केला.
सुनावणीदरम्यान ॲड. विपुल दुशिंग यांनी लक्ष्मी आंदेकर यांचा या गुन्ह्याशी थेट संबंध नाही असा युक्तिवाद केला. जामीन मंजूर झाल्यानंतर विशेष सरकारी वकिलांनी या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली. सुटका न करण्यासाठी ठोस कारण न सांगू शकल्याने उच्च न्यायालयाने सरकार पक्षाची ही मागणी फेटाळून लावली. अटक आरोपींपैकी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अजित पवार गटाकडून तुरुंगात राहून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा विजय झाला होता.
सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्यात १८ वर्षीय तरुण आयुष कोमकर याची निर्घृण हत्या केली होती. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला पार्किंगमध्ये गाठून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. हा हल्ला इतका भयंकर होता की यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. १ सप्टेंबर २०२४ मध्ये पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या घडवली होती.
आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा होता. मात्र वनराजच्या हत्या प्रकरणात आयुष कोमकरच्या वडिलांचा हात असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे वनराजच्या वडिलांनी म्हणजेच आयुषचे आजोबा आणि आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर यांनी ही हत्या घडवून आणली होती.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बंडू आंदेकरसह त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर, सून सोनाली आंदेकर यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण तुरुंगात आहेत.






