कात्रज- स्वारगेट भूमिगत मेट्रो कामासाठी टी बी एम पुण्यात दाखल

पुणे- कात्रज ते स्वारगेट भूमिगत मेट्रो प्रकल्पचा बोगदा खणण्यासाठी आवश्यक चार टनेल बोअरिंग मशीनपैकी (टीबीएम) पहिली मशीन पुण्यात दाखल झाली आहे. या मशीनद्वारे जानेवारीपासून प्रत्यक्ष बोगदा खोदण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
स्वारगेट-कात्रज हा ५.४६ किलोमीटर लांबीचा मेट्रो विस्तार पूर्णपणे भूमिगत असणार आहे. या मार्गिकेवर स्वारगेट आणि कात्रज अशा दोन्ही बाजूंनी बोगद्यांचे खोदकाम केले जाणार असून त्यासाठी प्रत्येकी दोन टीबीएम दोन्ही बाजूंनी काम करतील. या चारही मशीनचे खोदकाम पद्मावती येथे एकत्र येणार आहेत.
या मार्गावरील खडकाळ रचना लक्षात घेता, प्रत्येक टीबीएमद्वारे दररोज १० मीटर बोगदा खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गिकेच्या कामातील अनुभवाच्या आधारे हा वेग अपेक्षित असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. या मशीन जमिनीखाली २८ मीटर खोलीवर काम करणार आहेत.
भूमिगत मेट्रो स्थानकांच्या उभारणीसाठी आवश्यक शाफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. मार्केट यार्ड स्थानकाच्या शाफ्टच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे. या शाफ्टचा वापर भूमिगत बांधकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री उतरविण्यासह अन्य कामांसाठी केला जाणार आहे. स्वारगेट येथील लॉन्चिंग शाफ्ट तयार झाल्यानंतर टीबीएमची जोडणी करून ती जमिनीखाली उतरविण्यात येईल.
हा पूर्ण मार्ग भूमिगत असणार असून यावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी ५ स्थानके असतील. स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्तारामुळे कात्रज, धनकवडी, मार्केट यार्ड आणि पद्मावती परिसरातील प्रवाशांना थेट पिंपरी चिंचवड शहरात पोहोचता येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या दक्षिण भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.






