पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी – पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवारी (दि. ५ ) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल आता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि काळेवाडी परिसरातील वाहतूक सोयीची झाली आहे.
यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, आयुक्त विजय सूर्यवंशी, आमदार अमित गोरखे, नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, जितेंद्र ननावरे, निकिता कदम, प्रियांका कुदळे, सुनीता वाघेरे, मीनाताई नाणेकर, ड प्रभाग अध्यक्ष सविताताई खुळे, मनीषा लांडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संत तुकाराम नगर येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे देखील उदघाटन करण्यात आले.
पुलाची वैशिष्ट्ये व महत्त्वाची माहिती:
पुलाची एकूण लांबी १२९० मीटर आणि रुंदी १७.२० मीटर असून हा चारपदरी पूल आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हा पूल ६५.२८ कोटी रुपये खर्च करून बांधला आहे.
या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सन २०२३ मध्ये महानगरपालिकेकडून कामाचा कार्यादेश निघाल्यानंतरही कामाला गती मिळावी यासाठी विविध माध्यमांतून या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
या पुलामुळे पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील फाटकावर थांबण्याची गरज राहिली नाही. पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि काळेवाडी परिसरातील वाहतूक सोयीची झाली आहे. या उड्डाणपूलामुळे दापोडी, निगडी रस्त्याकडून पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर भागात जाणे सोईचे झाले आहे.
