धक्कादायक ! पुण्यातील सोसायटीत पिटबुल कुत्र्याचा ११ वर्षांच्या सायकलस्वार मुलावर हल्ला

पुणे- पुण्यातील हडपसर येथील एका नामांकित गृहनिर्माण सोसायटीत सायकलवरून जात असलेल्या ११ वर्षांच्या मुलावर पाळीव पिटबुल जातीच्या कुत्र्याने अचानक झडप घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याच्या मालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हेमंत दामोदर गाढवे (वय ४८ रा. बनकर कॉलनी, आकाशवाणी हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. म्रिनल महावीर माने (रा. अमर कोर्टयार्ड, डी. पी. रोड, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे. गाढवे यांचा ११ वर्षाचा मुलगा समरजीत हा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या उद्यानामध्ये सायकल घेऊन जात होता. त्यावेळी सोसायटीच्या तळघरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे तो सायकल हातात धरून थांबला. त्याचवेळी तिथे मोकळा सोडलेला पिटबुल जातीचा पाळीव कुत्रा अचानक धावत आला आणि त्याने मुलावर थेट झेप घेतली.
या हल्ल्यात कुत्र्याने मुलाच्या छातीच्या उजव्या बाजूला अत्यंत गंभीर चावा घेतला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला सोडण्यात आले. पाळीव कुत्र्याला सुरक्षितपणे बांधून न ठेवणे आणि त्यामुळे इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवून कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






