पोटच्या मुलांची जंगलात नेऊन हत्या करणाऱ्या आईला दुहेरी जन्मठेप ; मुळशी तालुक्यातील घटना

पोटच्या मुलांची जंगलात नेऊन हत्या करणाऱ्या आईला दुहेरी जन्मठेप ; मुळशी तालुक्यातील घटना 
Share

पुणे- आर्थिक अडचण आणि कौटुंबिक वादाला कंटाळून स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. भंसाळी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

पूनम संजय सोलंकी (वय २८, मूळ रा. खांडवा, मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे पती संजय सोलंकी यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पूनम सोलंकी हिने ५ जानेवारी २०२२ रोजी मुळशी तालुक्यातील शिरवली शिवारात स्वतःची साडेतीन वर्षांची मुलगी चंदा आणि दोन वर्षांचा मुलगा आनंद यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता.

सोलंकी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले होते. ते शिरवली परिसरात बांधकाम कामगारांसाठी असलेल्या छोट्या घरात राहत होते. पूनम मुलांना वारंवार मारहाण करत असल्याचे तपासात समोर आले होते. मुलांना मारू नको, असे समजावून सांगितल्यास ती चिडचिड करत असे.

५ जानेवारी रोजी पूनम दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडली. बराच वेळ मुले आणि पत्नी घरी न परतल्याने पती संजय यांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, पूनमने दोन्ही मुलांना जंगलात नेले आणि दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती मुलांना तिथेच सोडून लोणावळ्यात राहणाऱ्या भावाकडे गेली. दुसऱ्या दिवशी पूनमच्या भावाने संजय यांना फोन करून ती मुलांशिवाय लोणावळ्यात आल्याची माहिती दिली. मुलांबाबत विचारणा केली असता, पूनमने दोन्ही मुलांना मारून गवतात टाकल्याचे सांगितले.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विजय फरगडे आणि अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. पौड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ आणि पथकाने गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान धुमाळ यांचे निधन झाल्यामुळे न्यायालयात पौड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय शेंडगे यांनी साक्ष दिली.

उपलब्ध पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून पूनमला मुलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अखेर तिला दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.

Vedh News