पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने पेटवली सासऱ्याची रिक्षा

पुणे – पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात धरुन जावयाने सासऱ्याच्या रिक्षाला आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार हडपसर भागात घडला. ही घटना शांतीनगर वसाहतीत कॅनॉल रोडला ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.
प्रशांत संजय शिवशरण (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत जितेंद्र रामचंद्र राऊत (वय ४६, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत शिवशरण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. ही घटना शांतीनगर वसाहतीत कॅनॉल रोडला ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राऊत हे रिक्षाचालक असून त्यांची मुलगी नंदिनी हिचा प्रशांत शिवशरण याच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी झाला आहे. प्रशांत याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु पिऊन तो नेहमी पत्नी नंदिनी हिला मारहाण करुन त्रास देत होता. यामुळे जितेंद्र राऊत यांनी नंदिनी हिला ते माहेरी शांतीनगर वसाहत येथील घरी घेऊन आले. प्रशांत याने तिला नांदायला पाठवा, म्हणून राऊत यांना अनेकदा सांगितले. परंतु, त्यांनी तिला पाठवले नाही.
हा राग मनात धरुन ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास प्रशांत शिवशरण याने कॅनॉल रोडच्या बाजुला पार्क केलेल्या रिक्षाला आग लावून पेटवुन दिली. त्यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रशांत शिवशरण याला अटक केली आहे. पोलीस हवालदार रमेश गायकवाड तपास करीत आहेत.






