पुण्यात FDA ची मिठाई विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई ! १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट

पुणे- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ हजार ४३५ किलो मिठाई व खाद्यपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले.
पुण्यातील कॅम्प परिसरातील कराची स्वीट मार्टमधून मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा असे १८६ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे ९० हजार ७८० रुपये आहे. तपासणीदरम्यान खाद्यरंग वापराच्या नोंदी, खव्याची साठवणूक व हाताळणी तसेच कालबाह्य घटकांच्या वापराबाबत त्रुटी आढळल्या.
वानवडी येथील पौर्णिमा स्वीट्स आणि केशवनगर-मुंढवा येथील जनता स्वीट्स यांच्याकडे आवश्यक परवाना व नोंदणी नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. मोहम्मदवाडीतील बिकानेर मिठाईवाल्यांकडील २६८ किलो बर्फी अयोग्य साठवणूक व हाताळणीमुळे जप्त करून नष्ट करण्यात आली. पिंपळे सौदागर येथील भायल स्वीट्समधून ९२.५ किलो खाद्यपदार्थ, तर काळेवाडीतील पुणेरी स्वीट्समधून ३५ किलो कलाकंद जप्त करण्यात आला.
शिक्रापूर येथील श्री गणेश लाडूवाले यांच्याकडून ६०५ किलो मिठाई, तर मंचर येथील राजमिलन स्वीट्समधून २५० किलो मीठा मावा जप्त करून नष्ट करण्यात आला. याशिवाय मुळशी तालुक्यातील मान-बोडकेवाडी येथील चामुंडा माँ रबडीवाला आणि शिवाजीनगर गावठाणातील न्यू क्वालिटी डेअरी फार्मवरही FDA ने कारवाई केली.






