आळंदी- आळंदी येथील इंद्रायणी नदीत जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने गणेशमूर्ती विसर्जनास पूर्ण बंदी केली आहे. नदीकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून नागरिकांनी मूर्ती नदीत न सोडता संकलन केंद्रांवर जमा कराव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इंद्रायणी नदीकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले असून कोणीही भाविक नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. भाविकांच्या सुविधेसाठी वैतागेश्वर मंदिर जवळचा इंद्रायणी घाट, झाडीबाजार नदी घाट, वाय जंक्शन, नगरपालिका चौक, केंद्रे महाराज मठ आणि सिद्धबेट या ६ प्रमुख ठिकाणी मूर्ती संकलन व दान केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
येथील व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेचे ११ अधिकारी आणि ६३ कर्मचारी असा ७४ जणांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सर्व मूर्ती संकलन केंद्रावर एलईडी लाईट, टेबल, खुर्च्या आणि माईकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आळंदी शहरात गणेशोत्सवात डीजे व लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करण्याचे निर्देश आहेत.
