बारामती- या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या गांजाची किंमत तब्बल अडीच कोटी होती. या गांजा प्रकरणाचे धागेदोरे आता थेट ओदिशापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी विकी विजय कांबळे (रा. भीमनगर, जळोची; सध्या तांदुळवाडी, बारामती) याला बुधवारी २ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान तेथे ‘समृद्धी अॅक्वा’ कंपनीचे १५०० लिटर क्षमतेचे दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळले. या ड्रममध्ये ४६५ पॅकेट्समध्ये ४७८ किलो ९५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी ड्रमसह सुमारे २ कोटी ३९ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन ड्रममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कोणी आणला? तो कुठून आला? आणि पुढे त्याचे वितरण कोणाकडे होणार होते ? हा तपासासमोरील महत्त्वाचा प्रश्न होता.
पोलिसांनी गेल्या सुमारे सहा महिन्यांत तांत्रिक तपासावर भर देत मोबाईल सीडीआर, डम्प डेटा, आयएमईआय मॅपिंग, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या वाहनांच्या हालचालींचे विश्लेषण केले. सहआरोपींची चौकशी करून मिळालेल्या माहितीचीही अन्य पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्यात आली. या तपासात प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांची नावे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग आणि राहुल गोरे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
जॉकी माझी हा ओडिशामधील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कांबळेचा आणि जॉकी माझी यांचा संपर्कअसल्याचा धागा पोलिसांना मिळाला. त्यामुळे जळोचीतील गांजा प्रकरणाचा संबंध स्थानिक व्यवहारापुरता मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्यीय पुरवठा साखळी काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, गांजाचा स्रोत, ओडिशातून होणारी वाहतूक, स्थानिक साठवणूक आणि वितरण याबाबत महत्त्वाचे धागे कांबळेच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे.
