महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या मित्रांवर कराडजवळ काळाचा घाला ; ४ ठार ३ जखमी

सातारा- व्यावसायिक बोलणी झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत गावी येताना भरधाव स्कॉर्पिओ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात कराड शहराजवळील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर मंगळवारी (दि. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
या अपघातात तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकत्याच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या सहापदरी उड्डाणपुलावरील हा पहिलाच मोठा जीवघेणा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला.
कातरखटाव गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांपैरी दोघांचं कोल्हापूरमध्ये व्यावसायिक काम होते. एकाला दरवर्षाप्रमाणे दिवाळीत गावात फटाक्यांचा स्टॉल लावायचा होता. त्यासाठी घाऊक विक्रेत्याला फटाक्यांची ऑर्डर द्यायची होती. दुसऱ्या एकाला चहा विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी कोल्हापुरातील व्यावसायिकाची फ्रँचाईची घ्यायची होती. या कामाच्या निमित्ताने सर्वजण स्कार्पिओ कारने (क्र. MH 11 DH 8381) कोल्हापूरला गेले होते. व्यावसायिक कामे झाल्यानंतर त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन ते गावी परत येत होते.
अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस आणि महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. कारच्या नंबरवरून मालकाचं नाव शोधून काढल्यानंतर सर्वजण खटाव तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेमुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कातरखटाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.






