ब्रेकिंग न्यूज

देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे निधन

Share

लंडन- ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे सोमवारी सकाळी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2011 मध्ये ज्या रुग्णालयात देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच रुग्णालयात सुनील आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने आनंद कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रकृती अचानक बिघडल्याने सुनील आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. सुनील यांच्या निधनाची माहिती पुतणी जीना नारंग यांनी दिली. त्यांनी कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

सुनील हे देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचे एकुलते एक अपत्य होते. लहानपणापासूनच ते चित्रपट वातावरणात वाढले आणि हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या नावांशी त्यांचा संबंध होता. त्यांचे काका चेतन आनंद आणि विजय आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. सुनील आनंद यांनी अमेरिकेतील अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डीसी येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या वडील देव आनंद यांच्याप्रमाणे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. १९८४ मध्ये त्यांनी ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर सुनील यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. मात्र ते आपल्या वडील देव आनंद यांच्यासारखी लोकप्रियता मिळवू शकले नाहीत.