ब्रेकिंग न्यूज, बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार ; मुंबईच्या जुहू परिसरातील घटना
मुंबई – बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून टायगर श्रॉफ बचावले असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. मात्र या हल्ल्यात टायगर श्रॉफ यांच्या गाडीचा चालक आणि एक ऑटो रिक्षा चालक जखमी झाले आहेत. ही घटना आज, रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ त्यांच्या कारमधून परतत असताना हा हल्ला झाला. एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात टायगर श्रॉफ यांच्या गाडीचा चालक आणि एक ऑटो रिक्षा चालक जखमी झाले आहेत.
टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून बाहेर येत असताना लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी ही घटना घडली. या संदर्भात एका व्यक्तीने काढलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. गोळीबाराची तीन ते चार राऊंड फायर केल्याचा आवाज या व्हिडीओ ऐकायला येत आहे.
जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पश्चिम परिमंडळ-२ चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. पोलीस सध्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित तपासाचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, “ही घटना धक्कादायक आहे, निंदाजनक आहे. या घटनेमधून एक प्रकारची दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे. टायगर श्रॉफ एक उभरता अभिनेता आहे. त्याला धमकी देऊन, त्याच्या गाडीवर फायरिंग करून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी या घटनेसंदर्भात मुंबई पोलिसांशी देखील बोललो. या घटनेसंदर्भात मुंबई आयुक्तांनी टीम तयार करून तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोरांना जशास तसं त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, कोणाचीही दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही, मुंबईत कलाकारांना घाबरण्याची गरज नाही”
