बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून ४४ लाखांचा गांजा पुणे विमानतळावर जप्त

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून ४४ लाखांचा गांजा पुणे विमानतळावर जप्त
Share

पुणे – बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून ४४ लाखांचा गांजा पकडण्यात सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. एका प्रवाशाने बॅगेच्या बाजूच्या अस्तरात गुप्त कप्पे तयार करून, त्यात हवाबंद पाकिटांत गांजा लपवून आणला होता. मात्र, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्याची ही युक्ती उघड झाली. त्याच्याकडून एक किलो २६५ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड(गांजा) जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची अवैध बाजारातील किंमत ४४ लाख २७ हजार रुपये आहे. 

पुणे सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि विमानतळ पथकातील अधिकाऱ्यांनी १९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘आयएक्स-२४१’ या विमानाने आलेल्या भारतीय प्रवाशाच्या प्रवासी प्रोफाइलची तपासणी आणि चेक-इन बॅगेचे क्ष-किरण स्कॅनिंग करताना अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्याच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. प्रवाशाच्या वैयक्तिक वस्तूंच्या खाली बॅगेच्या दोन्ही बाजूंच्या अस्तरामध्ये दोन गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते.

पाकिटांमधील पदार्थाची प्राथमिक क्षेत्रीय चाचणी केली असता, तो उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक वीड असल्याचे निष्पन्न झाले. एकूण एक किलो २६५ ग्रॅम वजनाचा हा साठा सीमाशुल्क विभागाने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) जप्त केला. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Vedh News