प्रवाशाच्या बुटाचे सोल कापताच बाहेर पडले अमली पदार्थ ; पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार

प्रवाशाच्या बुटाचे सोल कापताच बाहेर पडले अमली पदार्थ ; पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार
Share

पुणे – बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाच्या बॅगची तपासणी केली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. पण विमानतळवरील अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी या प्रवाशाच्या बुटाचे सोल कापून पाहिले असता समोर जे दृश्य दिसलें ते पाहून सीमाशुल्क अधिकारी देखील चक्रावून गेले. 

बँकॉकहून एयर इंडिया एक्सप्रेसच्या आयएक्स-२९१ या विमानाने येणाऱ्या भारतीय प्रवाशाची तपासणी करण्याची गोपनीय माहिती पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या प्रवाशाच्या बॅगची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. इतक्यात त्याने घातलेल्या काळ्या स्पोर्ट्स शूजकडे बघताच अधिकाऱ्यांना संशय आला.

त्याच्या पायातील शूजचे वजन आणि सोलची जाडी संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी बुटांची बारकाईने तपासणी केली. बुटांचे सोल कापून तपासणी केली असता, त्यामध्ये खास कप्पे तयार करून लपवून ठेवलेले ३८९.२७ ग्रॅम हशिश जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Vedh News