ब्रेकिंग न्यूज

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारे रॅकेट ,पाच जणांना अटक

Share

पुणे- नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव), पीयूष गणेश भरम (वय २६, रा. कचरावत चाळ, आंबेगाव), लक्ष्मण परमेश्वर माने (वय १९, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-दत्तनगर रस्त्यावर २४ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास इंजेक्शनची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले.

आरोपींकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली. तेव्हा त्यात इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या पिशवीत मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या (मेफीवन) ५० बाटल्या सापडल्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही जण या इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असून, या इंजेक्शनचा वापर काहीजण नशेसाठी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.