ब्रेकिंग न्यूज

आषाढी एकादशी उत्साहात साजरी, पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

Share

पंढरपूर- संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक शासकीय महापूजा संपन्न झाली. सलग २० वर्षे वारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील माने दांपत्याला यंदा मुख्य पूजेत मुख्यमंत्र्यांसोबत बसण्याचा मान मिळाला.

आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची मुख्य शासकीय महापूजा केली. या महापुजेला मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचे वारकरी म्हणून बसण्याचा बहुमान दिला जातो. यंदा धाराशिवच्या बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या माने दांपत्याला हा मान मिळाला. हे दांपत्य धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील असून ते शेतकरी आहेत.

“आम्ही २० वर्षांपासून वारी करतोय,आमच्या कुटुंबात वारी करणारी ही तिसरी पिढी आहे. मानाच्या वारकरी होण्याचा मान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हते. यंदा हा मान मिळाला” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संतांच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून विठ्ठल दर्शनासाठी १५ ते २० लाखांहून अधिक भाविक पंढरीत पोहचले आहेत. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करून विठ्ठलाचे दर्शन २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘ड्राय डे’ पाळण्यात आला असून सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. तसेच पंढरपूर शहरात वारकरी भावनांचा आदर करत १५ दिवस मांस आणि मासे विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.