ब्रेकिंग न्यूज

आपले नाव मतदार यादीमधून वगळले जाऊ शकते, आजच एसआयआर गणना अर्ज भरा

Share

मुंबई- राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदार गणना या प्रक्रियेबाहेर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या उर्वरित मतदारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतचीच अंतिम मुदत शिल्लक आहे. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १८ जून २०२६ पर्यंत एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार नोंदणीकृत आहेत. यापैकी ७ कोटी ६० लाख ९८ हजार १५३ मतदारांचे स्वाक्षरीसह गणना प्रपत्र गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित १८.४६ टक्के म्हणजेच १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदारांची गणना प्रपत्रे अद्याप जमा होऊ शकलेली नाहीत. या प्रक्रियेबाहेर राहिलेल्या संवर्गामध्ये प्रामुख्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा समावेश आहे.

मुंबईतील केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटलाईज झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदारांनी स्वतःहून वेबसाईटवर तपासणी करावी, राजकीय पक्षांनीदेखील यादी तपासावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट आहे.

कोणताही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये म्हणून या ‘एएसडीडी’ यादीतील मतदारांची योग्य रीतीने पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) राजकीय पक्षांच्या केंद्रस्तरीय प्रतिनिधींसोबत (बीएलए) संयुक्त बैठक घेऊन मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. जे मतदार घरी गेल्यानंतर गणना प्रपत्र स्वीकारण्यास किंवा त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देतील, त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत, असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.