मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर बॅगेत स्फोटक असल्याचे सांगितल्याने विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित प्रवाशाला अटक करून तपासणी केली असता त्याने केलेला दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
अनुज जयराम सुवर्णा (वय ५५) असे या प्रवाशाचे नाव आहे.
ही घटना सकाळच्या वेळी घडली. टर्मिनल 2 च्या बोर्डिंग गेटजवळ दिल्लीसाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानात संबंधित प्रवासी चढला होता. सुरक्षा तपासणीच्या प्रक्रियेदरम्यान त्याने अचानक “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे वक्तव्य केले. हे ऐकताच सीआयएसएफच्या जवानांनी तातडीने अलर्ट जारी केला. कोणताही धोका पत्करायचा नाही या भूमिकेतून विमानाचे उड्डाण टेकऑफच्या अगदी आधी थांबवण्यात आले. विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले.
अनुज याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याचवेळी बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने संपूर्ण विमान, प्रवाशांचे सामान आणि कार्गोची सखोल तपासणी करण्यात आली. प्रवाशांना टर्मिनलच्या सुरक्षित भागात हलवण्यात आले होते. काही तासांच्या कसून तपासणीनंतर विमानात किंवा सामानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
प्राथमिक चौकशीत अनुजने “आपण फक्त मजेत बोललो होतो” असे सांगितले. मात्र विमानतळावरील सुरक्षेशी खेळणे हा गंभीर गुन्हा असल्याने सहार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला काही काळासाठी अटक करण्यात आली होती. नंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या खोडसाळपणामुळे शेकडो प्रवाशांमध्ये भीती पसरली, विमानांचे वेळापत्रक कोलमडले आणि एअरलाईनचे आर्थिक नुकसान झाले. या तपासादरम्यान दिल्लीसह इतर काही देशांतर्गत उड्डाणांनाही थोडा विलंब झाला.
