नाशिक- नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या विकासकामांमुळे अगोदरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या दरम्यान होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शासनाच्या वतीने युद्धपातळीवर विकासकामे सुरु आहेत. याच कामातून भ्रष्टाचार बोकाळला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या कामाच्या वर्कऑर्डर दिल्या जातात. परंतु माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी वर्कऑर्डरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकासकामासाठी कथित ५९१ कोटींच्या बनावट वर्कऑर्डर दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले महेश झगडे ?
महेश झगडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की मी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून २००३ चा कुंभमेळा हाताळला होता. बनावट वर्कऑर्डर हे २१ व्या शतकातील जिल्हा प्रशासनासाठी नामुष्कीचा निचांक आहे. कथित ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर निष्पक्ष चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र भाष्य करत, कथित प्रकाराच्या गांभीर्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कुंभमेळ्यासारख्या संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या प्रकल्पात अशा स्वरूपाच्या आरोपांमुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याची भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि प्रशासनातील माजी अधिकाऱ्यांकडूनही होत आहे.
