नवी दिल्ली- कॅब किंवा रिक्षा बुक करताना किंवा प्रवासादरम्यान आता चालकाला किंवा कंपन्यांना टीप मागता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून सर्व वाहन अॅग्रीगेटर्सना त्यांच्या मोबाईल अॅप्लिकेशन्समधून हे पर्याय त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक कंपन्या ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अॅपच्या युझर इंटरफेस (UI) मध्ये राईड बुक करताना स्क्रीनवर “Advance Tip निवडा”, “कॅब लवकर मिळण्यासाठी टिप जोडा” किंवा “जर तुम्ही टिप दिली, तर ड्रायव्हर तुमची राईड स्वीकारण्याची शक्यता जास्त आहे”, असे मेसेजेस दाखवले जायचे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून कॅब लवकर मिळावी यासाठी ट्रीपच्या अगोदरच टीप देऊन कॅब बुक केली जाते.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांनुसार या प्रकाराला बंदी घातली आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन एग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे अपडेट करून ‘टीप दिली तरच राईड लवकर मिळेल’ किंवा ‘ड्रायव्हर तुमची राईड लवकर स्वीकारेल’ असे दिशाभूल करणारे मेसेज ॲपवर दाखवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यांना प्रवासापूर्वी ‘ॲडव्हान्स टीप’ मागण्याचे पर्याय ॲपवरून त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन तांत्रिक नियमांनुसार, अॅप्सना आता केवळ प्रवास पूर्ण झाल्यानंतरच टिप देण्याचा पर्याय UI स्क्रीनवर उपलब्ध करून देता येईल. त्यापूर्वी बुकिंग दरम्यान किंवा चालत असलेल्या राईडमध्ये हा पर्याय ब्लॉक राहील. याशिवाय, डिजिटल पेमेंट गेटवेमध्ये मोठा बदल करत, TRAI आणि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की प्रवाशाने दिलेली टीप शंभर टक्के थेट चालकाच्या डिजिटल वॉलेट किंवा बँक खात्यात जमा झाली पाहिजे. कंपन्यांना या रकमेतून कोणत्याही प्रकारचे कमिशन, प्लॅटफॉर्म फी किंवा ट्रान्झॅक्शन चार्जेस कापून घेता येणार नाहीत.
नवीन नियमांमुळे प्रवाशांची अनावश्यक त्रासातून सुटका होणार असून चालकांचाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी दिलेली टीप संपूर्णपणे चालकालाच हस्तांतरित करावी लागेल, त्यातून कंपन्यांना कोणताही हिस्सा कापून घेता येणार नाही. राईड पूर्ण झाल्यावरच ग्राहकांना स्वेच्छेने टीप देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे आता कोणतीही कॅब किंवा रिक्षा बुक करताना तुम्हाला आधीच जास्तीचे पैसे किंवा टीप देण्याची अजिबात गरज नाही.
