पुणे – दारूच्या नशेत भरधाव कारमधून हातामध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन मध्यरात्री स्टंटबाजी करणाऱ्या चार परप्रांतीय तरुणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दररोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. परप्रांतीय तरुणांनी रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन भरधाव कारमधून हे तरुण स्टंटबाजी करताना आढळून आले. डेक्कन पोलिसांनी या चार तरुणांना अटक केली आहे.
दारूच्या नशेत या तरुणांनी सेनापती बापट रोड, नळ स्टॉप आणि डेक्कन परिसरात कारच्या काचा उघडून, हातात बिअरच्या बाटल्या घेत स्टंटबाजी केली. या तरुणांनी गाडीच्या खिडकीच्या काचेतून अर्धे शरीर बाहेर काढले होते. तसेच गाडी भरधाव जात असताना जोरजोरात आरडाओरड सुरु होती.
तरुणांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी तरुणांच्या गाडीच्या नंबरप्लेट्स पाहून त्यावरुन शोध घेत चौघांना अटक केली.
या चारही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण हरियाणातून पुण्यात मित्रांना भेटण्यासाठी आले होते. पार्टी केल्यानंतर नशेत हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे
