ब्रेकिंग न्यूज

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्योजकांना फोन, उद्योगधंद्यांच्या स्थलांतर विषयी या दिवशी घेणार बैठक

Share

देशातील आघाडीचे ऑटोमोबाईल हब असलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी मधील २० हून अधिक लघुउद्योगांनी खराब रस्ते, तीव्र वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांना कंटाळून सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संभाव्य स्थलांतराची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील उद्योजकांसोबत बैठक आयोजित केली असून या बैठकीत उद्योजकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे.

चाकणमधून अद्याप एकही कंपनी बाहेर गेलेली नाही, असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या विकासासाठी आणि रस्त्यांच्या कामांसाठी १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योजकांच्या समस्या केवळ फोनवर न जुमानता त्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली आहे, ज्यामध्ये रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांवर तोडगा काढला जाणार आहे.

काय आहेत उद्योजकांच्या समस्या ?

चाकण परिसरातील सुमारे १,००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आणि ४,००० पेक्षा जास्त प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार धोक्यात आले आहेत. चाकणमधील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात होऊन कामगारांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होते. केवळ ५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी २ तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने कंपन्यांचे उत्पादन वेळापत्रक कोलमडले आहे. वाहतूक कोंडीमुळे कामगार वेळेवर शिफ्टसाठी पोहोचू शकत नाहीत आणि कच्चा माल तसेच तयार मालाची वाहतूक विस्कळित होत आहे

चाकणमधील पहिल्या ५ टप्प्यांमध्ये नवीन उद्योगांना विस्तारासाठी पुरेशी जागा शिल्लक नाही. तसेच वसाहतीमधील ठेके, माथाडी कामे आणि इतर व्यावसायिक कामांसाठी स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती व नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे.