दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिंपरी- चिंचवड पोलीस आले धावून! दिली एक कोटी रुपयांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिंपरी- चिंचवड पोलीस आले धावून! दिली एक कोटी रुपयांची मदत
Share

पिंपरी- दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक कौतुकास्पद पाऊल टाकले आहे. पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे. या माध्यमातून जमा झालेला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्प आणि विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा निधी राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणार असून, त्यानंतर तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, आपणही समाजाचे देणे लागतो. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. तो संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. महाराष्ट्र राज्य देशात रिस्पॉन्स टाइमच्या बाबतीत अव्वल असून, राज्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक केले. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक अभिमानाने आपण या शहरात राहतो, असे सांगतो, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत आणि विकासात स्वर्गीय अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड यांच्यातील नात्याच्या आठवणींना उजाळा दिला.

Vedh News