भूगोल फाउंडेशनतर्फे खेडच्या पश्चिम दुर्गम भागात आदिवासी बांधवांसाठी दिवाळी फराळ वाटप

राजगुरूनगर- “माणुसकीचा दीप म्हणजे दिवाळी” या उपक्रमा अंतर्गत रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वृक्षवेलीनी नटलेल्या निसर्गरम्य भागातील वाघु, कोहिंडे खुर्द, वेताळे कातकरी वस्ती, गोलापूर या दुर्गम भागात आदिवासी कातकरी गरीब गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे, लहान मोठे सर्वांना नवीन कपडे व शालेय साहित्य देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी,कातकरी ,गरीब व गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या दुर्गम भागात जाऊन आपल्या भूगोल फाउंडेशनचे एक सहकारी संभाजीराव मिंडे यांच्या मार्गदर्शनाने गरीब गरजू अशा लोकांना स्थानिक ग्रामस्थांच्या समक्ष वंचित कुटुंबाना दिवाळी फराळ, पणत्या, महिलांना साड्या, लहान मुलामुलींना कपडे, टी- शर्ट व शाळेतील मुलांना वह्या, फुटपट्टी व पेन, पेन्सिल, स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
भेटवस्तू घेतल्यानंतर त्यांना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. या कार्यासाठी मुलींचे कपडे अत्यल्प दरात अभिजित पुरनाये यांनी दिले. हिरकणी हॉस्पिटलचे डॉ. सोनाली व डॉ. तांबे यांनी साडया व मुलींचे कपडे दिले तसेच भंडारी कलेक्शन यांनी सहा, नऊवारी साड्या अत्यल्प दराने दिल्या, कीर्ती नाईक यांनी वह्या पेन पेन्सिल, विश्वास समुद्र काका यांनी कपडे व आर्थिक, तसेच सुनीता बिरादार यांनी विशेष सहाकार्य केले
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी संस्थेच्या पदाधिकारी शोभा फटांगडे, ज्योती दरंदळे, मनोज माकोडे आणि रोहिणी वाळुंज यांनी सर्व दिवाळी फराळ, कपडे व्यवस्था, शालेय साहित्याचे नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.वाटप कार्यक्रम सुरुवातीला वाघू नंतर कोहिंडे खुर्द, वेताळे कातकरी वस्ती, गोलापूर गावातील आपल्या संस्थेच्या सर्वांचे स्वागत केले
सकाळच्या गरमागरम नाष्टा ५० पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे श्रीकांत केटरर्सचे श्रीकांत मोरे यांनी केल्यामुळे दिवसभराचा काम करण्याचा मार्ग सुकर झाला. यावेळी भूगोल फाउंडेशन , संतनगर मित्र मंडळ,इंद्रायणी सेवा संघ,वटेशवर महिला भजनी मंडळ,तसेच संस्थेचे खालील सहकारी या उपक्रमात प्रत्यक्ष सामील झाले होते. ग्रामस्थांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा करून भूगोल फाउंडेशन च्या सर्वांचे आभार मानले.






