विमान हवेत असतानाच आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न ; प्रवाशाच्या विरोधात गुन्हा

पुणे – दिल्लीहून पुण्याकडे येणारे विमान हवेत असतानाच आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला. या प्रकरणी संबंधित प्रवाशाच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव सत्येंद्र रौतेला (वय ३३, रा. सासवड) असे सर्व प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी खासगी विमान कंपनीचे कर्मचारी ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानातून प्रवास करत होता. रौतेला हा खासगी कंपनीत नोकरीला आहे. कंपनीच्या कामानिमित्त तो दिल्लीला गेला होता. विमान हवेत असताना रात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास आसन क्रमांक १९ क वर बसलेल्या रौतेला याने विमान कर्मचाऱ्यांची परवानगी न घेता आपत्कालीन दरवाजाच्या लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानातील सेन्सर कार्यान्वित झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याच्याजवळ जाऊन विचारणा केली. त्यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरले.
रौतेला याने आपत्कालीन दरवाजाच्या लिव्हरच्या कव्हरशी छेडछाड करून इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केला. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १२५ आणि विमान अधिनियम कलम २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.






