मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुल मधील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे बनावट ओळखपत्राच्या साहाय्याने घुसखोरी करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या दोघांपैकी एकाकडे परवाना असलेली बंदूक आढळून आली आहे. मुंबई दौऱ्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चे उद्घाटन केले.
रोहन पारेख (वय २४) आणि राजाराम कुंडे (वय ४९) अशी दोघं आरोपींची नावे आहेत. यापैकी रोहन पारेख स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचं सांगत होता. त्याच्याकडे PMO कार्यालयाचं बनावट ओळखपत्र देखील आढळून आले आहे. तर राजाराम कुंडे याच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आढळून आले आहे.
आरोपींनी संशयित सरकारी ओळखपत्र दाखवून मॉलच्या सुरक्षारक्षकांना न जुमानता आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही संशयित नेमकं कोणत्या उद्देशाने मोदी हजर राहणार असणाऱ्या कार्यक्रमस्थळी आले होते? त्यांचा काही घातपात घडवण्याचा कट होता का की वेगळं काही कारण होतं? या सगळ्यांचा तपास आता केला जाणार आहे.
