मुंबई- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ आणि ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले असून शिंदे दोन दिवसीय दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव होणार आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांनी म्हटले आहे.
१० सप्टेंबर २०२६ रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६: ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ चे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. याच सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे.
या सन्मानासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची विशेष दखल घेतली असून यामध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व रोजगार मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या लंडन दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. याप्रसंगी, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’नेसह उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिंदे यांचा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे.
