लाचखोरी प्रकरणी मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

पिंपरी- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत अटक झालेले महापालिकेचे मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओभासे यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निलंबित केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. त्यानुसार ओभासे यांचे निलंबन २९ ऑक्टोबर २०२६ या अटकेच्या दिवसापासून लागू करण्यात आले आहे.
ACB पुणे विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान ३८ लाख रुपयांच्या टेंडर फाईलवर सही करण्यासाठी ०.५० टक्के दराने १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ओभासे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ओभासे यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र ठेवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर चौकशी अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
निलंबन काळात ओभासे यांना नियमानुसार निर्वाहभत्ता मिळणार असला, तरी त्यांना अन्य कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना निश्चित केलेले मुख्यालय सोडता येणार नाही.






