एसटी कर्मचाऱ्यांसाठी १० हजार रुपये बोनस जाहीर, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. या बैठकीत दिवाळीच्या बोनसबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असं परिहवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळीचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“दिवाळीचा पहिला दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर केला आहे. दिवाळाच्या पहिल्या दिवशी त्यांचं तोंड गोड केलं आहे. त्यामुळे ते प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणार नाहीत. संप ते मागे घेतील आणि दिवाळीनंतर आपण बैठक घेऊ”, असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केले.
“माझं याच माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, तुम्हाला एसटी महामंडळ जेवढं देता येईल तेवढं देतं, माझ्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गरज पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जितकं जास्त देता येईल तितकं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. असं असताना संपासारखं हत्यार कुठेही न उपसावं अशी विनंती मी त्यांना वारंवार करत आलो आहे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
“एसटी कर्मचाऱ्यांनी आजही ज्या मागण्या केल्या त्यासाठी आम्ही फार वेळ घेतला नाही. सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा हा निर्णय घेतला असेल त्यांनी त्याचा विचार करता संपासारख्या पर्यायाचा वापर वारंवार करणे योग्य नाही. जेणेकरुन सर्वसामान्य प्रवाशांना त्यामुळे त्रास होईल”, असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.






