जगाला हेवा वाटेल असा अजितदादा यांच्यावर बायोपीक बनवणार ; दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची घोषणा

बारामती – सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी दादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही कदाचित त्यांच्या पावलांची सवय झाली असेल. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील की, सकाळी सकाळी धावत येणारी ती पावलं कुठे गेली ? इतकी कामाशी नाळ जोडलेली माणसं फार कमी पाहायला मिळतात. अशा शब्दात सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अजितदादा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा नेत्यावर मी जगाला हेवा वाटेल असा अजितदादा यांच्यावर बायोपीक बनवणार असा निर्धार प्रवीण तरडे यांनी केला.
जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदी म्हणून बारामती येथे आयोजित एकांकिका साहित्य संमेलनात प्रवीण तरडे यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या कला प्रवासाबरोबरच तरडे यांनी अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा हे स्पष्टवक्ते, विलक्षण शिस्तीचे आणि नागरिकांच्या बाबतीत कमालीचे संवेदनशील व्यक्ती होते. एखादे काम होणार असेल तर ते नक्की करत असत. होणारे काम नसेल तर ते संबंधित व्यक्तीला स्पष्टपणे सांगत. त्यांच्या टेबलावर फायलिंचा ढीग कधीच नसायचा. असा प्रश्नांची जाण असणारा नेता दुसरा नाही.
त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, असे मला प्रामाणिकपणे वाटते.” अशा भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या. अशा व्यक्तिमत्वावार चित्रपट का काढू नये असा सवाल प्रवीण तरडे यांनी केला.






