‘माझ्या लेकाला परत आणा…!’ बोपदेव घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सिद्धेशच्या आईची आर्त हाक

‘माझ्या लेकाला परत आणा…!’ बोपदेव घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सिद्धेशच्या आईची आर्त हाक
Share

​पुणे- बोपदेव घाटात झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. या भीषण अपघातात सिद्धेश राजे, मोहिनी चौधरी आणि विशाल दांगडे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी जखमी झाले. यापैकी पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या सिद्धेश राजे याने आपला जीव गमवावा लागला.

सिद्धेश हा इंजिनिअरिंग शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाचा पहिलाच पेपर देऊन घरी येत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. सिद्धेश याचे वडील शेतकरी आहेत. आपल्या एकुलत्या एका मुलाने शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवावे, या आशेने घरची परिस्थिती बिकट असतानाही वडिलांनी कर्ज काढण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्याच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात भाड्याचे घर घेऊन त्याला तिथे ठेवले होते.

या दुर्दैवी घटनेमुळे राजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या एका मुलाच्या अशा अकाली जाण्याने सिद्धेश राजे याची आई पूर्णपणे खचून गेली आहे. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी मोठा हंबरडा फोडत आपल्या तीव्र वेदना व्यक्त केल्या. मला कोणाकडून काहीच नको असून, मी कालपासून माझ्या बाळाची वाट पाहत आहे, माझ्या बाळाला परत आणा, असा आर्त टाहो त्यांनी फोडला. तसेच या भीषण दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषीला कदापि सोडू नका, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सिद्धेशच्या काकांनी केली आहे.

कसा झाला अपघात ?

​ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी बोपदेव घाट भागातील गारवा हॉटेल समोरील बस स्टॉपवर घडली. तेथे अनेक विद्यार्थी बसची प्रतीक्षा करत उभे होते. त्याच वेळी घाटातून अत्यंत भरधाव वेगाने खाली आलेल्या एका अनियंत्रित आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिद्धेश राजे, मोहिनी चौधरी आणि विशाल दांगडे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना धडक दिल्यानंतरही संबंधित टेम्पो चालकाने वाहन न थांबवता इतर एक-दोन वाहनांनाही धडक दिली आणि सुसाट वेगात घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत टेम्पो चालक प्रतीक मारुती चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आपल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाले होते, असा दावा चालकाने केला आहे. परंतु, वाहनाचे ब्रेक खरोखरच फेल झाले होते, तर पुढे स्थानिक नागरिकांनी अडवल्यानंतर तो टेम्पो अचानक कसा थांबला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Vedh News