पुण्यातील बोपदेव घाटात बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक ; दोन विद्यार्थ्यांचा जागेवर मृत्यू

पुणे – पुण्यातील बोपदेव घाटात आज, बुधवारी (दि. २५) एक भीषण अपघात घडला. बोपदेव घाट परिसरात बसची वाट पाहत बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात भरधाव आयशर टेम्पो घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तीन विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
बोपदेव घाटातील गारवा हॉटेलजवळ दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. बस स्टॉपवर स्थानिक शाळा आणि कॉलेजचे काही विद्यार्थी बसची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी घाटातून जाणाऱ्या एका भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्याला जोरदार धडक देऊन पुढे निघून गेला.
या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघाताचा मोठा आवाज आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस द तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण ब्रेक फेल झाल्यामुळे घडले की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.






