दुर्गादेवी टेकडीवर नागरिकांचे चिपको आंदोलन ! दुर्गादेवी टेकडीवरील नियोजित पाण्याची टाकी अन्यत्र उभारण्याची मागणी

पिंपरी- निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर नियोजित पाण्याची टाकी अन्यत्र उभी करून येथील झाडे वाचवावीत अशी मागणी करीत पिंपरी-चिंचवडकर पर्यावरणप्रेमींनी दुर्गादेवी टेकडीवर झाडाला मिठी मारून चिपको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने निगडी येथील दुर्गा टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्याकरता २२७ वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली दुर्गादेवी टेकडीवर झाडाला मिठी मारून चिपको आंदोलन करण्यात आले. नियोजित पाण्याची टाकी दुर्गा टेकडी ऐवजी बंद असणाऱ्या वाटर पार्क अथवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर उंच पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी केली.
‘झाडे वाचवा ऑक्सिजन वाचवा’, ‘या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात भगवान पठारे, रघुनाथ रोकडे, आप्पासाहेब पाटील, संतोष मुंगसे, विकास नाणेकर, तानाजी मांडवे, गणेश जन्नरकर, मनोज ढेरे, सनी पवार, बापू जाधव, कुलदीप बोरकर, ॲड कैलास भालेकर, सुनील जांभळे, अशोक टिळेकर, निलेश शिंदे, जितेंद्र चावडा, कोळी मामा, बाबा मोहिते, रोकडे गुरुजी, प्रशांत मातेरे, भावेश पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला या चिपको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
या प्रकल्पासाठी महापालिकेने हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मात्र हरकती व सूचना दाखल करण्याकरता नागरिकांना पुरेसा वेळच मिळू नये याची काळजी घेतली असा आरोप मारुती भापकर यांनी केला. नियोजित पाण्याची टाकी दुर्गा टेकडी ऐवजी बंद असणाऱ्या वाटर पार्क अथवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर उंच पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी केली.
नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवून येथील वृक्ष संपदा वाचवावी असे आवाहन मारुती भापकर यांनी केले आहे. हरकती व सूचना यांचा फार्स करून महापालिका वृक्षतोडीला प्रशासन प्राधान्य देणार असेल तर शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्था व दुर्गा टेकडीवरील दररोज येणारे ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, महिला व विद्यार्थी यांना एकत्रित करून मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा भापकर यांनी प्रशासनाला दिला आहे.







