सहा वर्षीय बालिकेचे अपहरण; दोन सतर्क नागरिकांमुळे दापोडीत सापडली !

सहा वर्षीय बालिकेचे अपहरण; दोन सतर्क नागरिकांमुळे दापोडीत सापडली ! 
Share

पिंपरी – निगडी परिसरातून अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा दापोडी येथे सुखरूप शोध लागला आहे. दापोडीतील दोन सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पोलीस उपायुक्तांनी दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

६ वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून बालिकेचा शोध सुरू होता.

दरम्यान, दापोडी येथील विसावा परिसरात अनिल शिवाजी काची (रा. काची चाळ, दापोडी) आणि अजय गोरख कांबळे (रा. दापोडी) यांना ही बालिका एकटी खेळताना आढळली. त्यांनी तिच्याकडे घराचा पत्ता आणि पालकांबाबत विचारपूस केली. मात्र, बालिकेला केवळ कन्नड भाषा येत असल्याने संवाद साधण्यात अडचण निर्माण झाली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोघांनीही वेळ न दवडता बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या बालिकेचा शोध घेण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत झाली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, संदीप आटोळे यांच्या हस्ते अनिल शिवाजी काची आणि अजय गोरख कांबळे यांचा दापोडी पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान, परिसरात एखादे लहान मूल एकटे किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.

Vedh News