पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया ; काय म्हणाल्या?

पुणे- पुण्यात आज बुधवारी भरदुपारी अत्यंत गजबजलेल्या शिवाजीनगर न्यायालय परिसरातील ४ नंबर प्रवेशद्वाराजवळ एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
आज भरदुपारी सव्वा एकच्या सुमारास झालेल्या या थरारक घटनेत मंदार किवळे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बुधवारी दुपारी मंदार किवळे हा न्यायालयातील सुनावणी आटोपून गेट नंबर ४ मधून बाहेर आला होता. नेमक्या त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला घेरले. या हल्लेखोरांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्याच्यावर वार केले. भर गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला.
प्राथमिक तपासानुसार या हल्ल्यामागे जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि वैमनस्य असल्याचा संशय पुणे पोलीस यंत्रणेने व्यक्त केला आहे. जखमी झालेला मंदार किवळे हा २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरण मधील आरोपी असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो शिवाजीनगर न्यायालय येथे आला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट करत त्यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयता हल्ला घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही आणि आरोपींना सोडले जाणार नाही, असा ठाम इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी पुणे पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. यापुढे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणे आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे, या बाबींवर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.







