शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला

शिरूर – शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मुंबई बाजार परिसरात आज भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला. भर पेठेतील बंद घराच्या मागील बाजूची खिडकी फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सुमारे दोन तोळे वजनाच्या दागिन्यांसह सव्वादोन लाख रूपयांची रोकड चोरून नेली.
मुंबई बाजार परिसरात राहणारे शहरातील प्रसिद्ध वकील ॲड. शिरीष भिकाजी लोळगे यांच्या घरी घरफोडीचा हा प्रकार घडला. ॲड. लोळगे हे मुलगा आदित्य व सूनबाईंसह एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सकाळी पुणे येथे गेले होते. लग्नसमारंभ उरकून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले.
घराचा पुढील दरवाजा उघडून आत आल्यावर मागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीने आतील बाजूस जावून पाहिले तेव्हा घराच्या मागील बाजूस असलेल्या वाड्यालगत स्वयंपाकघराची खिडकी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात जावून पाहिले असता स्वयंपाकगृहाजवळील खोलीतील कपाटाचे दार तुटल्याचे व या कपाटातून दोन लाख दहा हजार रूपयांची रोकड तसेच इतर एका खोलीतील कपाटातून साधारण अडीच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दोन लाख दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला आहे
त्यांनी तातडीने आपला मुलगा आदित्य व इतर सहकारी मित्रांना कळवून पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सहकारी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी केलेल्या पाहणीत ॲड. लोळगे यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळा वाडा आहे. त्याच्या शेजारी मोकळी जागा आहे. या जागेतून येऊन वाड्याच्या भिंतीवरून चोरट्यांनी आत उडी मारली.
त्यानंतर स्वयंपाकगृहाची खिडकी तोडून एकाला आत पाठविले. त्याने आत जावून मागील बाजूचा दरवाजा उघडून इतर चोरट्यांना आत घेतले व काही वेळातच त्यांनी घरातील दागिने व रोख रकमेसह चीजवस्तूंवर हात साफ केला.
चोरी केल्यानंतर चोरट्यांनी मागील बाजूनेच पलायन केले असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास केला जात आहे.






