”……पण फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?” पुण्याच्या महापौरांच्या फ्लेक्सवर पुणे महापालिकेचा सवाल

पुणे- शहारत लावण्यात आलेल्या बेकायदा फ्लेक्सविरोधात पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी धडक कारवाई सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना देखील यामधून सूट दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून थेट पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत खास पुणेरी टोला लागवण्यात आला आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या विकासनिधीतून पुण्यातील एका भागात ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र या कामाची माहिती देणारा आणि सदर कामामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी वक्त करणारा फ्लेक्स लावण्यात आला आहे. यावर भाजपच्या तीन नगरसेवकांसह मंजुषा नागपुरे यांचा फोटो आणि नाव आहे. याच फ्लेक्सचा फोटो शेअर करत “ड्रेनेजची तसदी समजू शकतो, पण फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?” असा खोचक सवाल महापालिकेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून विचारण्यात आला आहे.
सध्या महापालिकेतर्फे शहरभर सुरू असलेल्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वागत केले होते. ‘सध्याही शहरात अतिक्रमण आहे. प्रशासकराज होते, तेव्हाही शहरात अतिक्रमण होते. आता शहरात आठ दिवसांपासून कारवाई सुरू आहे. त्याला आमचा आणि नागरिकांचाही पाठिंबाच आहे. शहरात चांगले काही घडत असेल, तर सर्वांनी त्याच्या पाठीशी असले पाहिजे,’ असे सांगून नागपुरे यांनी प्रशासनाचे आभारही मानले होते. आता महापौरांनी आपल्या प्रभागात लावलेल्या फलकाचा फोटो शेअर करून महापालिकेने कारवाई करताना कोणालाही सूट दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, धडक कारवाई सुरू केल्यानंतर महापालिकेने दंडाच्या रकमेतही वाढ केली आहे. अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनरवरील दंडाची रक्कम महापालिकेने वाढवली आहे. त्यानुसार दोन हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?
#pmc #pune #Encrochment #action @navalMH @prajytnair https://t.co/7oOb2G1Eui
— PMC Care (@PMCPune) November 25, 2026
या परिपत्रकानुसार अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स आदींसाठी प्रतिबोर्ड, प्रतिदिन दोन हजार रुपये दंड आकारला जाईल. अनधिकृत होर्डिंग्जसाठी प्रतिहोर्डिंग दोन लाख रुपये निष्कासन शुल्क आकारले जाईल. तात्पुरते बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्स, कमान यावरील जाहिरात, ड्रोनच्या साह्याने लावलेल्या जाहिराती, बलून, मानवी पाठीवरील, लाकडी लोखंडी कटआउट; तसेच अन्य तात्पुरत्या जाहिरातींसाठी प्रतिचौरस फूट ४० रुपये दंड असेल. याशिवाय फिरत्या वाहनावरील जाहिरातीसाठी विनापरवानगी दुचाकी वापरल्यास पाच हजार रुपये, तीन चाकीसाठी १० हजार, तर त्यापुढे २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा खर्च संंबंधित जाहिरात फलकधारकाने न भरल्यास ही रक्कम संबंधित जागा मालकाकडून वसूल करण्यात येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.







