पुणे- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत समाजमाध्यमातील रीलमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संतोष पंडित याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी संतोष गजानन पंडित (वय ४८, रा. नारायण पेठ) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संतोष पंडितने महिलांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने लैंगिक शेरेबाजी करणारी चित्रफीत समाजमाध्यमात टाकली; तसेच घटनात्मक पदावरील मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्द वापरून त्यांची बदनामी केली आणि समाजात अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपी पंडितला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या नोंदीवर असलेल्या या आरोपीविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात दोन, डेक्कन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांत महिलांचा विनयभंग, बदनामी आणि अवमानकारक चित्रफिती प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तपास करत आहेत.
