पुणे – ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी पुण्यात आलेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपहरण केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेपत्ता व्यक्तीच्या अपहरण केल्याची पहिली फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती मग ती १८ वर्षाच्या खालील असो अथवा प्रौढ व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष असो, बेपत्ता व्यक्तीची तक्रार आल्यास तातडीने एफआरआर नोंद करुन तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी प्रथम पुण्यात करण्यात आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी परभणीहून पुण्यात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे.
दीपक मधुकर खिस्ते (वय २५, रा. निवळी, ता. जिंतुर, जि. परभणी) असे या तरुणाचे नाव आहे. दीपक हा ३१ ऑगस्ट रोजी कोण होणार करोडपती’ या माधुरी दीक्षित सुत्रसंचालन करणार्या मराठी कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी पुण्यात आला होता. त्याने आपल्या वडिलांना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका दुचाकीस्वाराकडून मोबाईल घेऊन त्यावरुन फोन केला होता. त्याने आपला मोबाईल हरवला असल्याचे सांगून तो गावाकडे येत आहे, असे कळविले होते. त्यानंतर त्याचे नातेवाईक त्याची वाट पहात होते. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ अक्षय बबनराव खिस्ते यांनी पुण्यात येऊन त्याचा एस टी स्टँड, रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये केवळ अल्पवयीन बेपत्ता झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येत होता. प्रौढ व्यक्ती बेपत्ता झाल्यास पोलीस हरवलेल्या व्यक्तीच्या नोंदवहीत त्याची नोंद करुन शोध घेण्यात येत असे. पुढे चौकशीत अपहरण, बेकायदेशीर बंदिवास, तस्करी, अन्य गुन्ह्यांचे संकेत मिळाल्यास त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात येत होता. २२ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत मानवी तस्करीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी न्यायालयाने सूचना जारी केल्या आहेत. या आदेशाचे पालन झाले नाही तर संबंधित राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना अवमानाची नोटीस बजावण्यात येईल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
