ब्रेकिंग न्यूज

पुतणीने प्रेमविवाह केल्याचा रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला, पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक घटना

Vector illustration in HD very easy to make edits.
Share

पिंपरी- पुतणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार विशालनगर पिंपळे निलख येथे घडला. मंगळवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात संबंधित तरुणावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काशीनाथ लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कासारवाडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार अमोल अण्णासाहेब वीर (वय ३३) हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी सायली काळूराम लांडगे हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून संदीप तानाजी लांडगे आणि रोहन अर्जुन लांडगे यांनी अमोल वीर यांना शिवीगाळ करत धारदार लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. संदीप लांडगे याने अमोल यांच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अमोल वीर गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोल वीर यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान आरोपी रोहन लांडगे याने कमरेला लावलेलं पिस्तुल बाहेर काढून अमोल यांच्या दिशेने रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.