पुणे – विना परवानगी गैरहजर राहून दारुच्या नशेत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका पोलीस हवालदाराला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
बबन अशोक वाघ असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ड्युटीवर होता. बबन वाघ हा १७ जुलै २०२६ पासून विना परवानगी गैरहजर आहे. या कालावधीमध्ये त्याने ४ सप्टेंबर रोजी दारुच्या नशेत एका तरुणीचा विनयभंग केला. या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बबन वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. त्याचा अहवाल चतु:श्रृंगी पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठविला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली. बबन वाघ याच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी बबन वाघ याला निलंबित केले आहे.
