ब्रेकिंग न्यूज

महिलेच्या झुंबा क्लास विरोधात कारवाई टाळण्यासाठी ७ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारास अटक

Share

बारामती – महिलेच्या झुंबा क्लासवर कारवाई टाळण्यासाठी ७ लाखांची लाच मागणाऱ्या बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड येथे दुपारी ३ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने ही कारवाई केली.

महेश अंकुश उगले (वय ३६, ब. नं. २६३७) असे लाचखोर पोलीस हवालदाराने नाव असून तो बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

याबाबतची माहिती अशी की तक्रारदाराच्या पत्नीचा झुंबा डान्स क्लास व जिम आहे. मात्र या क्लासमुळे नागरिकांनी त्रास होत असल्यामुळे क्लास तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध कारवाई करण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी पोलीस हवालदार महेश उगले याच्याकडे प्राप्त झाला होता.
या अर्जावर कारवाई न करण्यासाठी उगले याने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितले अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ सप्टेंबर रोजी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपी उगले याने यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे आणि उर्वरित पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मंगळवारी सापळा रचून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना उगले याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.