ब्रेकिंग न्यूज

चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी ५० हजारांची लाच ; सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहाथ सापडला 

Share

पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.

कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. क्वीन टॉवर शेजारी, महादेव नगर, मांजरी) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर याच्याकडे होता. तक्रारदार व मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांचा मुलगा प्रतीक याचा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये मदत करण्याकरीता कृष्णा बाबर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच या गुन्ह्यात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केळी. या तक्रारीची ८ सप्टेंबर २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात कृष्णा बाबर याने दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मांजरीतील शितलादेवी मंदिरासमोर कारमध्ये तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृष्णा बाबर याला पकडण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कृष्णा बाबर याला अटक करण्यात आली आहे.