ब्रेकिंग न्यूज

पळून जाऊन लग्न केलेल्या जोडप्याचे अपहरण, मुलीच्या बापासहित पोलीस कॉन्स्टेबलला अटक

Share

पुणे – पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी चेन्नई येथून मुलीच्या बापासहित एक व्यक्ती आणि एक पोलीस कॉन्स्टेबल पुण्यात आंबेगाव पठार भागात आले. तिथून मुलगी आणि तिच्या पतीचे अपहरण करून लॉजवर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे या जोडप्याची सुटका झाली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीचे वडील, कुटुंबातील आणखी एक सदस्य आणि त्या कॉन्स्टेबलला अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि उत्तर प्रदेशातील बस्ती येथील मूळ रहिवासी असलेल्या परधर्मीय तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यातून ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पदवीधर असलेल्या त्या तरुणीने आपल्या पालकांना न सांगता पुण्यात येऊन सुमारे १० दिवसांपूर्वी त्या तरुणाशी विवाह केला होता. तो तरुण व्यवसायाने सुतार आहे.

संबंधित तरुणीच्या वडिलांना समजताच त्यांनी चेन्नई पोलिसांकडे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. मुस्लिम धर्मीय वडिलांना आपली मुलगी हिंदू मुलाशी विवाह करते हे मान्य नव्हते. तरुणीच्या मागोवा घेत तिचे वडील आणि एक नातेवाईक चेन्नईहून कॉन्स्टेबलसोबत पुण्यात आले. त्या तिघांनी सोमवारी त्या तरुणीला आणि तिच्या पतीला बिल्डिंगखाली बोलावले. त्यानंतर त्यांनी दोघांना पकडून त्यांचे हात-पाय दोरीने बांधले, त्यांना एका कारमध्ये कोंबून वेगाने निघून गेले.

ही सर्व घटना त्या जोडप्यासोबत राहणाऱ्या रुममेटने पाहिली आणि घरमालकाला याची माहिती दिली. घरमालकाने त्वरित भरती विद्यापीठ पोलिसांना फोन करून कळवले. पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी या जोडप्याला म्हाळुंगे येथील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तरुणाला मारहाण केली. पोलिसांचे पथक लॉजवर पोहोचण्यापूर्वीच चेन्नईहून आलेले ते तिघे त्या जोडप्याला कारमध्ये घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघून गेले होते.पोलिसांनी त्यांच्या कारचा पाठलाग करून खेड शिवापूर जवळ कार अडवली. सर्वाना पोलीस ठाण्यात आणून तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

आपण सज्ञान असून कायदेशीर पद्धतीने विवाह केल्याचे तरुणीने सांगितले. तसेच पतीसोबत राहणार असल्याचे ती म्हणाली. अपहरणकर्त्यांना मदत केल्याच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांच्या कॉन्स्टेबल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारण बेपत्ता महिलेबाबत माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याऐवजी तो थेट त्या जोडप्याच्या घरी गेला होता. जेव्हा त्या महिलेचे वडील आणि नातेवाईक त्या जोडप्याला मारहाण करत होते, तेव्हा त्याने त्यांना रोखले नाही. इतकेच नाही तर, ज्या वाहनातून त्या महिलेचे आणि तिच्या पतीचे अपहरण करण्यात आले, त्या वाहनातून तो स्वतःही प्रवास करत होता, असे पोलिसांनी सांगितले.